Wednesday, 6 December 2017

असंच असतं माणसाचं

खूप पाऊस होऊन गेल्यानंतर
ढग रिकामे झाल्यानंतर
सुर्यावरचा काळा पडदा हटतो
उबदार किरण धरणीवर येतात
पाखरांचे पंख पाणी झटकून टाकतात
अंग मोकळं करण्यासाठी उंच भरारतात....
रस्ते चकाकू लागतात
पान पान तकाकतं
"पावसाची रिपरिप सरली"
म्हणत त्रासलेले जीव सुटतात
हवाहवासा पाऊस
अतिवृष्टी ठरतो तेव्हा
उघड मिळावी म्हणून
डोळे आकाशाकडे लागतात...

असंच असतं माणसाचं
त्याला दुःखही सोसवत नाही, सुखही!

-Bageshree

Tuesday, 5 December 2017

समर्पण


आठवतंय कान्हा,
तू म्हणाला होतास
" राधे, नाती 'अनुभवावी' लागतात. तेव्हाच माखून जाता येतं त्यात. अंतर्बाह्य. नखशिखांत."
दिलं होतंस मला उदाहरण की,
"लेकरू असल्याशिवाय आईपण कळत नाही! ते कळण्यासाठी नात्याच्या गाभ्यात शिरून गोवावी लागते नाळ."
कान्हा,
तू फक्त दिली नाहीस समर्पणाची व्याख्या तर
दिलास हात, आणि, उतरवलेस मला समर्पणाच्या खोल गर्भात.
मला कळत गेलं. या गर्भाला अंत नाही.
मी उतरत गेले आणि पाहिलं स्वतःचं मग्न रूप.
तुझ्याठायी एकरूप झालेलं.
निळ्याशार गर्भातल्या निळाईने
नकळत माखून टाकलेलं...
आणि आलं उमजून कान्हा
समर्पणाच्या या डोहात
तू फार पूर्वीच उतरून गेला होतास
मी ही सोडलाय काठ
गोवते आहे नाळ
तुझ्या नाळेशी... घट्ट. 

-बागेश्री

Monday, 4 December 2017

डोळे

मला तुझे डोळे
माझ्यासारखेच वाटतात
तितकेच खोल, तितकेच अपूर्ण
एकेकदा असंही वाटतं
मला आणि तुला
दिसतही सारखंच असावं
वाटतही सारखंच असावं
आपल्यात
रुजतही सारखंच असावं
पण तू माझ्याकडे पाहतोस तेव्हा
तुला दिसणारी मी
मला नाहीच दिसत कधी..
मग घेऊन जाते
तुझी नजर
मला ओढून अन्
तुझ्या आत
आणते फिरवून
माझ्याच वेगवेगळ्या रुपांमधून!
 आणि सोडते जेव्हा .. बाहेर आणून
तेव्हा मात्र, माझी खात्री झालेली असते..

तुझे माझे डोळे
अगदी सारखे आहेत

-बागेश्री

Tuesday, 21 November 2017

माझं घर

तुझ्या खांद्यावर आश्वस्त होत डोकं टेकवल्यावर, माझं घर होत जातोस...
मला आवडतं तुझ्या- माझ्यातलं घर
दिसत नसूनही असलेलं
आश्वासक
जिथे पोहोचलं की जगाची तमा नसते
अंधाराचं भय नसतं
काळजीची काजळी उतरते
उरतो प्रसन्न वावर
डोळ्यांत तजेला
अपरंपार मनशांती
तिथून निघण्याची लगबग
हात हलवून तुझा हसरा निरोप
तू घराचं दार अलवार मिटून घेत असताना
तुझ्याकडे ते जास्त सुरक्षित आहे हे जाणवून
मी शांत होत जाते
व्यवहाराच्या जगात परतण्यासाठी सज्ज होत जाते
-बागेश्री

Monday, 20 November 2017

व्यक्तिमत्व एक झाड

आपलं व्यक्तिमत्व एक झाड. आणि. आपली प्रत्येक गरज म्हणजे त्याची एक- एक फांदी.

              आपल्याला समजून घेण्याची गरज, आपल्या हुशारीला, व्यवहार चातुर्याला, चालाखीला, निरागसतेला, आपल्यातले अजिंक्य, आपल्यातली हार, नैराश्य, उदासी, खेळकरपणा आणि आपल्याइतकंच वेडं होऊन उत्स्फूर्त टाळी मिळण्याची गरज.  आपलं फक्त ऐकून घेण्याची, आपल्याला समजावून सांगण्याची, आपल्या सोबत मुक्त उडण्याची, आपण गाताना आपल्या सोबत गाण्याची, आपण हरवले असता आपल्यासोबतीने हरवण्याची, गवसण्याची, बुडण्याची, तगवण्याची गरज.
             अशी आपली प्रत्येक गरज म्हणजे त्या झाडाची एक फांदी. म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्त्वला लाख फांद्या.  चौफेर पसरलेल्या. आपल्यातून फुटलेल्या.....

इवल्याशा रोपट्याचं झाड होणं. प्रक्रिया! म्हटली तर सहज, नैसर्गिक. म्हटली तर जाणिवा जागृत होताना लक्षपूर्वक केलेली. झाड पूर्ण वाढलं. बहरू लागलं. मोहरलं. की पोषणाची भ्रांत उरत नाही. उत्कर्षाची उरते. ही जाणिव सजग होताच गरजेच्या फांद्या लवलवू लागतात. फोफावू लागतात. झाड जितकं डेरेदार. बहरदार. तितक्या विपुल फांद्या. जितक्या विपुल फांद्या, तेवढाच संभाव्य उत्कर्ष मोठा.

कधीतरी, कुठल्यातरी, एका फांदीवर, येऊन बसतो, एक पक्षी. फांदी डोलून पाहते. पक्षीही चाचपून पाहतो. ओळख पटते. दोघांच्याही गरजेचे वर्तूळ पूर्ण होते. विकसीत होण्याकरता अशी वर्तूळंच कारणीभूत ठरतात, या विश्वासाने दोघेही मोहरून जातात.
                         हळू- हळू प्रत्येकच फांदीला मिळू लागतो, हक्काचा पक्षी. 

गरजपूर्तीच्या आनंदाने बहरलेलं झाड अधिकच संपूर्ण, संपन्न दिसू लागते.  पण निसर्ग खरा किमयागार!
                         डेरा जसजसा वाढू लागतो तितके झाड जमिनीशी अधिकाधिक घट्ट जुळू लागते. मुळे अजूनच खोलवर जाऊन ऐसपैस बसतात. आणि झाडाला स्पष्ट जाणवू लागते की, क्षणभर विसाव्यासाठी आलेले हे पक्षी त्याच्या स्थिर, स्वयंभू आयुष्यातले फक्त पाहूणे आहेत. आणि झाडाने त्या अतिथींचा केवळ यथायोग्य सत्कार करायचा आहे. आतिथ्य करायचे आहे. पाहूण्याजोग्याच त्याच्या गरजादेखील कायमस्वरूपी नाहीतच!

   झाड पूर्वीही सक्षम होते. झाड आताही सक्षम आहे....  त्याची नाळ जमिनीशी घट्ट असेस्तोवर ते सक्षमच रहाणार आहे.
                  या जाणिवेनिशी स्वतःच्याच गरजांतून मोकळ्या झालेल्या झाडाच्या फांदीफांदीतून नवचैतन्य संचारतं. आताही पक्षी येतात. झाड त्रयस्थपणे आसराही देतं. पक्षी क्षणभर विसावतात, उडून जातात. आता झाडाच्या हिशोबी कुठल्याच नोंदी नसतात....

-बागेश्री
    

Sunday, 19 November 2017

परतीचा प्रवास (Come Back Home)

परतीचा प्रवास सुरू केला आणि
मला भेटत गेले
तेच पर्वत
तीच झाडे
तेच पक्षी
तेच वाडे
ज्यांना ओलांडून
मजल दरमजल करत
मी गाठला होता
अपेक्षित मुक्काम.

मुक्कामाकडे येताना
घरून घेतले होते सोबतीला
थोडेसे बालपण
एकच महत्वाकांक्षा
आकाशाला भिडण्याची
उरातली आकांक्षा..
लहान सहान आवडी
रंगबिरंगे पेन
नवी कोरी डायरी
एक मन बेचैन...
पण प्रवास फार लांबचा
हळू हळू सारे काही बदलत गेले!
काही सोडावे
तर काही सूटत गेले.....
रिकाम्या हातानी
मुक्काम गाठला तेव्हा
स्वतःसकट सारे
नवे नवे वाटले...
नव्याच्या नवलाईत
नवे ऋतू भेटले.
पण
वर्षे सरली तशी
आठवण तीव्र झाली
कुठूनतरी जून्या घराची
आर्त साद आली..

परतीचा प्रवास सुरू केला तेव्हा
भेटू लागले
तेच पर्वत, तीच झाडे
तेच पक्षी, तेच वाडे
आणि मला माहितीय
मी तिथेही, रिकाम्या हातानेच
पोहोचणार आहे.
पण मी, माझ्या
माझ्या घरी जाणार आहे.
-बागेश्री

#comebackhome

Tuesday, 14 November 2017

पेपरवेट

काही करून काय होणार आहे किंवा काहीही न केल्याने काय होणार आहे, अशा प्रश्नांची उत्तरे जेव्हा "काही नाही" वर येऊन ठेपतात तेव्हा एक रिकामपण दाटतं, शुद्ध रिकामपण. नखात, काळजात, मनात, उरात, देहात, घरात... फक्त रिकामपण. एक अशी पोकळी जिथलं गुरुत्वाकर्षण एकाएकी संपतं आणि आपली पावलं तरंगू लागतात. आपल्यावरचा आपल्या अपेक्षांचा पेपरवेट आपणच अचानक काढून घेतल्यानंतरची अवस्था.
-बागेश्री