चिमणी

मी तुळशीपाशी, लावता पणती एक
अंगणात शेजीची, येते चिमणी सुरेख

कसे गाल गुलाबी, कानी झुलती डूल
हातात बाहुली आणि जाईचे फूल...
अन् म्हणते करूनी गाल गोबरे मजला,
"पाहूनी मला का, रडूच येते तुजला?"

तिज सांगू कशी मी, गोड पाहूणी तू गं
तव प्रेमाचे हे  भरते येई मला गं..
तू सरसर सरसर होशील बाळा मोठी
अन् जाशील उडूनी पुन्हा न फिरण्या पाठी

जणू सारे समजले, अशी हलवते मान
अन मला सांगते "खाऊ आण जा छान"
मी गंमत देता, बाहुलीत ती रमते
तिला घास भरवते, गुज मनीचे करते...
मग पावडर खोटे, तिट टिळाही देते
हृदयास धरूनी "राणी माझी" म्हणते

मग मलाही वाटे, घ्यावे शिकून जरासे
हे तंत्र खुशीचे, गाणे आनंदाचे ...

ती भुर्रकन जाते, आली तैसी उडूनी
अन् साठवते मी, आत-आत ती चिमणी...

©बागेश्री देशमुख

Post a Comment

0 Comments