नेमेची येतो, मग हा हिवाळा.....

.... आणि मग पळत्या थंडीतले उन अंगाला चटकेपर्यंत अंगणात किंवा गच्चीत बसून नुकते धुतलेले केस वाळवत बसायचे. केसातून गालावर येणारे कवडसे अनुभवत, शिकेकाई किंवा रिठ्याचा घमघमाट श्वासात भरून घ्यायचा. आणि कानावर आईची हवीहवीशी "तिळपोळी झालीय बरंका गरमागरम" हाक पडायची.... ही त्या दिवसांची गोष्ट!

             मातीच्या बोळक्यांतून, टहाळाचे दाणे, साखरेचे काटे अंगावर उठलेले रंगबिरंगी तिळ, तिळाच्या रेवड्या आणि तिळ गुळाच्या पोळीचा नैवेद्य बाप्पाला झोकात दाखवला जायचा. भाजी- बाजरीची भाकरी- लोणी- ठेचा- मठ्ठा आणि तिळाच्या पोळ्या असा सरंजाम घेऊन,  घरातली सगळी टाळकी आंडीमांडी घालून, एकत्र मिळून जेवणावर ताव मारायची. पानात पातीचा कांदा आवर्जून असतानाही काकाला मात्र बुक्की मारून फोडलेला कांदाच खाण्याची हुक्की यायची आणि घरातल्या शेंडेफळास, "जा रे परडीतला कांदा आण एक" अशी आज्ञा सुटायची. तेही उत्साही तुरूतुरू आज्ञापालन करून आपले स्थान ग्रहण करताना पाण्याचा ग्लास (धक्का लागून?) न चुकता उलटा करायचे आणि ते पाणी आवरण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम पार पडायचा. विस्कळीत झालेले सारे पुन्हा सावरून, मंडळी गमती- जमती करत जेवायला बसायची!
         
 जेवणावर यथेच्छ ताव मारून (प्रत्यक्षात फक्त गुळपोळी चिवडून) बारक्यांची गँग खाली खेळायला उतरली की मग मोठ्यांच्या ख-या गप्पा रंगायच्या. सकाळपासून झालेल्या दगदगीवर या गप्पांचा उतारा असयाचा. एकमेकांना आग्रह करत यांचे तासभर जेवण चालायचे. ती मैफिल पाहण्याचा मोह मला कधीच सुटला नाही. मोठ्यांचे एक वेगळे रूप त्या पानावरच्या गप्पांमध्ये मी पाहिलेय. त्यांनी पाणी आणून दे, किंवा एखादी चटणीच आणून दे निमित्त करून मी तिथे रेंगाळायचे. मोठ्यांना असे रिलॅक्स असताना पहात रहायचे. त्यांच्या गप्पा कळत नसल्या तरी, या एकमेंकांमध्ये किती घट्ट प्रेम आहे, याची जाणिव आनंदी करायची. सण वाराला सारे जमून असे निवांत होताना पाहणे, म्हणजे सुख होतं.
              जेवणानंतर मागचे आवरतानाही, यांना बोलायला विषय पुरायचे नाहीत. एका विषयावरून दुस-या विषयावर काय सहज यांची गाडी घसरायची. त्या विषयाला स्पीड येईस्तो तिसरेच काही सुरू व्ह्यायचे. आई, काकू, वहिनी एक ट्रॅक तर बाबा, काका, दादा दुसरा. तरीही यांचे ट्रॅक अचानक कुठेतरी एकत्र येऊन सगळेच एका विषयावर बोलू लागायचे. हे समीकरण फार गंमतशीर वाटायचे.
               सगळी चकाचक आवरा आवर झाली, की- खाली सतरंजी टाकून गप्पांचा फड अजूनच रंगायचा. पान सुपारीचे डबे उघडत, भरल्या पोटी, कुणी कुठे, कुणी कुठे आडवे होत बोलत रहायचे. हे गप्पांचे आवाज दबत दबत हलकेच घोरण्याचे सूर आल्याशिवाय सण साजरा झाल्याचे वाटायचे नाही. मी ही आईच्या उबेला सुशेगाद निजून जायचे.
                   चारच्या फक्कड चहाला पुन्हा घरभर वर्दळ होऊन जायची. सणा वाराची सुटी अशी भरगच्च पार पडायची.

        आता एकत्र कुटुंब नसली तरी कुणी कुणाकडे फारसे जातही नाहीत. न्युक्लीअर फॅमिलीमुळे तर सण वार ज्याच्या- त्याच्या घरी. इन मिन, हम दो हमारा एक, इतक्यातच सण साजरे. चटकन जेवून, पटकन आवरून जो तो आपला मोबाईल घेऊन बसतो.
पुर्वी खरे तर मने इतकी मोठी होती की उणदुणं मिटवायला, संक्रातीची वगैरे वाट पहावी लागत नसे. आता माणसंच माणसांपुढे क्वचित येतात.  राग- लोभ सारे व्हर्चुअल!  त्यात सणावाराला व्हॉट्सअ‍ॅपवर शुभेच्छा पाठवल्या की, "मी दिल्या बाबा शुभेच्छा" हे समाधान पांघरूण दुपारी गाढ निजून जायला होते......

दररोजच्या जगण्यात बदलत काहीच नाही आणि मागे पाहिल्यावर सगळेच बदलून गेलेय असे वाटत राहते. तव्यावरच्या तिळाच्या पोळीला सुटलेल्या नॉस्टॅलजिक घमघमाटाने मला त्या दिवसात चक्कर मारून आणली, एवढे मात्र खरे!

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. माझेही बालपण अशा भरलेल्या घरात गेले. आम्ही ४ भांवड...गावी आजोबा-आज्जी, आत्या आणि मामा अशी तीन भली मोठ्ठी घर....खूप मज्जा यायची....आईं-वडिलांना कधी लक्ष द्यावे लागले नाही....१०-१५ वेगवेगळ्या वयाच्या पोरांचा पोरवडा असायचा. मोठ्ठ्या विहिरीत पोहणे 2-३ तास चालायचे....काका-काकू ह्यांची पाण्यात ठकलाठकली, आरडाओरडा, खूप सगळ आठवलं की मन तृप्त होत....

    ReplyDelete