पावसाळा आणि नॉस्टाल्जिया

पावसाळी कुंद हवेतच एक नॉस्टाल्जिया आहे. ती हवा चाटून जरी गेली तरी आपण कुठल्यातरी जुन्या आठवणींमध्ये रमतो. पावसाळ्याची दुसरी गम्मत ही की, हा पावसाळा पावसाळी आठवणींनाच "खो" देत राहतो. आपला आपल्या आत रम्य प्रवास सुरु होतो.. एकाने दुस-याला दिलेल्या "खो" बरोबर... पण फक्त गोड आठवणींचा चित्रपट नजरेसमोरून जाईल ते मन कसलं. मन लबाडपणे एखादी कडू आठवण आपल्याकडे सरकवतं आणि रंगलेल्या खेळात  नेमका बोचरा खडा पायाखाली येतोच. आपणही आता जगण्याला इतके सरावलेले की एखादी बोच न विव्हळता पेलू शकतो... कडू- गोड आठवणींचा हा खेळ अथक सुरू राहतो आणि बसमध्ये, रेल्वेत किंवा स्वतःच्याच घरी बाल्कनीत, खुर्चीत तंद्री लागलेले आपण, चेह-यावर येणार्‍या पावसाळी वार्‍याने हलकेच झोपेच्या अधीन होतो.....
             त्यानंतर येणारी जाग म्हणजे वास्तवाने आपल्याला दिलेला खो असतो... आणि आपण नकळत वर्तमानाच्या खेळीत ओढले जातो. मनाच्या तळाशी मात्र आपल्याच आयुष्यातल्या, आपल्याच घडामोडी आपल्याला उराउरी भेटून गेल्याच्या आनंद काही काळ नक्कीच तरळत राहतो!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments