तुला माती होता येईल का?
मी जाईन एके दिवशी जिरून
सगळी सुख दुःखे,
अहंकार
मान अपमान
खोटा खरा
स्व अभिमान घेऊन
मातीमध्येच मातीशी
येईन घट्ट जुळून
त्याआधीच,
तू माझ्या हक्काची, ती माती होशील?
तू येतोस
मुसळधार बरसण्यापुरता
वाहून जाण्याकरता
माझ्या देहावरून
तुझ्याशिवाय काहीच वाहून जात नाही..
तू आता बदल रूप
माझ्याकरता माती हो
माझ्यापुरती माती हो
तसंही, किती युगे ह्या चक्रात अडकायचंय??
मला तुला कायमचं भेटायचंय!
-बागेश्री