शब्द...

सुटीची मस्त सकाळ म्हटलं की हातात वाफाळत्या चहाचा कप आणि समोर वृत्तपत्र, ठरलेलंच!!
"घरकाम होत राहतील आरामात" कसली घाई नाही, गडबड नाही हा आल्हाददायी विचार करत पहिला घोट घेतला अमृततुल्याचा- चहाची चष्म्यावर आलेली वाफ साफ करत, वृत्तपत्रात घातलं डोकं...
'पुंजके' नावाचा स्तंभलेख वाचताना,
सुधीर मोघे म्हणतात- येथे रेंगाळले, ओळी सुंदरच होत्या,
"शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते,
वाहतात जे ओझे, ते तुमचे आमचे असते!"

वाचन खुंटलं इथेच... खरंच शब्द म्हणजे नक्की काय, नितळ पाणी?  भावनांचा रंग मिसळला की तेच भाव व्यक्त करणारे! ते स्वतःच खूप काही बोलतात, आपण व्यक्त होताना त्यांचा अजून खुबीने वापर केला की त्यांचं सौंदर्य अजूनच खुलतं- जणू एक एक शब्द म्हणजे दागिना, तो व्यक्त होणार्‍या सौंदर्यवतीने चढवावा अलवार, अंग- प्रत्यंगाचं सौंदर्य लाखपटीने नाही वाढलं तर बोलावं!!!

आज "शब्दावर" घ्यावं लिहायला.... खरंच! स्वतःशी ठरवत, वृत्तपत्र बाजूला सारत जरा सैलावून बसले, आज लिहावंच खरं...

इकडे मनात, उत्स्फूर्त टाळया मारत जमलेली शब्दांची मैफिल ताडकन सावध झाली....

कुणकुण : जरा, गप्पा - टाळ्या थांबवा, ती काहीतरी ठरवत आहे
व्यासंग : हो, तिचा 'शब्दांवर' लिखाण करायचा विचार सुरू आहे
अहं : करु देत की मग, आपण आहोतच श्रेष्ठ, प्रत्येकाने लिहायलाच हवं आपल्याबद्दल.. आपल्यावाचून  पानही हलत नाही, आपले उपकार नकोत मानायला?
निर्मोही : आपल्यावर? अरे आपण बापडे कोण लागून गेलो, आपण 'जा, वाक्यात अमूक जागी जाऊन बसा" म्हटलं की जाणारे... आपल्यावर कसलं आलंय लिखाण?
बंडखोर : ए चला, आपण सारे निघून जाऊया, थोडावेळ दूर!! आज ती काम करताना बरंच सुचेल तिला काही-बाही त्या आधी निघूयातच.. उठा
कुरघोडी : हो! आपणच नसू तर कसले आलेय लिखाण, कसले ते व्यक्त होणे, चला निघूया
खंबीर : का तिच्याशी असे वागता. मी येत नाहीये.
भटकंती : फिरलो नाहीये गेले कित्येक दिवसात, तिच्याच दिमतीला आहोत, दमलोय आता- चला निघूचयात..
कूच : या माझ्या मागून....

ज्यांच्यावर लिहायला घ्यावं, तेच रानोमाळ परागंदा झाले, माझ्याच समोर!

कामाला लागले, ते करण्यावाचून पर्यायही नव्हता....
तास, दीड तास...

मनाच्या तळाशी काही दूर्लक्षित शब्दांची हालचाल जाणवली...
एक- एक सारे हळूच मनःपटलावर येऊ लागले....

ह्यांनाच घेऊन लिहावं का? निवडावेत पण जरा... काही जीर्ण, काही उदास, काही मरगळलेले कुणी उगाच मलूल- हे नकोत सध्या, काही काळ...

निवडून एकेकाला टोपलीत भरत गेले, त्यांनाच नंतर सुसंबद्ध गोवून काहीतरी छानसं लिहावं, ह्या हेतूने!
बघता- बघता माझी टोपली भरली... आता ते ओसंडून वाहू लागले, त्यांना थोपवून धरावं म्हणून दोन्ही हात सरसावले... तसा, 'स्पर्श' अगदी उडी मारून बाहेर पडला, चालू लागला..

मी :अरे, अरे जरा थांब, का निघालास?
स्पर्श : तू हात लावून माझ्या अर्थाची भावना प्रत्यक्षात पोहोचवलीस, माझी गरज संपली
'ऊबेनीही' उडी मारत स्पर्शाचेच अनुकरण केले..
मी कारण विचारताच, म्हणाली,
ऊब : तुझ्या स्पर्शानेच माझा अर्थ थेट पोहोचतोय, मी का हवी इथ

मागोमाग माया, आपुलकी, प्रेम, वेड, लोभ, उल्हास, स्फूर्ती, आनंद, अपेक्षा आणि मी निवडलेले सारे सारे पडले बाहेर, मला मन मानेल ती कारणे देत.....

पुन्हा टोपली रिकामीच!!!

..... आज मला शब्द वश नव्हतेच!



-बागेश्री
१८/१२/११

Post a Comment

7 Comments

  1. भावलं! बागेश्री, शब्दातीत भावना नेमक्या पोचल्या बघ... :)

    अवांतर : काही जीर्ण... विरलेलं उगाच जपून ठेवतो ना आपण... कदाचित टोपली रिकामी राहणं सोसत नसावं...

    ReplyDelete
  2. व्वा .... भाषेवर अलंकारांचा साज चढविणार्‍या शब्दांनाच
    चेतनागुणोक्ती(अलंकार)ने सालंकृत केलंस बागेश्री.... छानच.

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेखन बागु...खुपदा शब्दांनी साथ न दिल्याने अव्यक्त राहतो आपण...अन काही वेळेस नको ते शब्द साठवून ठेवतो,,,खोलवर मनाच्या कपारयांत...!!
    दिवसेंदिवस मी तुझा पंखा होत चालली आहे हं...:)

    ReplyDelete
  4. Really a gud writing!!!!.......

    ReplyDelete
  5. धन्यवाद, मित्र मैत्रिणींनो :)

    ReplyDelete